स्वाधिष्ठान चक्र मेरुदंडावर लिंगस्थानाजवळ असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते. हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून जलतत्त्व शरीरास पुरविते. जल हे निसर्गातील संरक्षक तत्त्व आहे. हे आकाश तत्त्वाचे नष्ट होणे, वायूचे खवळणे आणि गती तसेच अग्नीच्या उष्णतेपासून संरक्षण करते. शरीरातील सर्व प्रवाहित भाग जसे की रक्त, संप्रेरके, मूत्र, स्वेद, लाळ, रज/शुक्र, वंगण इत्यादीमध्ये जलतत्त्वाचा मुख्य कार्यभाग असतो.
स्वाधिष्ठान चक्र हे शरीरातील निर्मिती चक्र आहे. याचा रंग नारिंगी आहे. संवर्धन हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. शारीरिक व मानसिक विकास या चक्रावर अवलंबून असतो. स्वाधिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे. शरीरात तन्यता, आर्द्रता व मऊपणा राखण्याचे महत्त्वाचे कार्य जलतत्त्व करते. घामामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. वंगणामुळे सांधे कार्यरत राहतात. रक्तामुळे शरारातील प्रत्येक पेशीचे पोषण होते. मूत्र किडनीला सर्व कचरा बाहेर टाकण्यास मदत करते. लाळ व पाचक रस अन्नपचनात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच जलतत्त्व हे भावनांशी जोडलेले आहे. स्वाधिष्ठान चक्र सक्षम असणारी व्यक्ती मनमिळाऊ, प्रेमळ व कल्पक असते. स्वाधिष्ठान चक्र कमकुवत झाल्यास, शरीराला जलतत्त्व कमी पडू लागते. लाळ, घाम, मूत्र, वंगण, रज इ. कमी होते. ज्यामुळे शरीरात रखरखीतपणा, तर भावनांमध्येही कोरडेपणा जाणवू लागतो. तर स्वाधिष्ठान चक्र अतिसक्रिय झाल्यास शरीरात जलतत्त्वाचे प्रमाण वाढते. स्वभाव अति भावूक, संशयी व शंकेखोर बनतो. शारीरिक व मानसिक विकास मंदावतो.
ध्यान - स्वाधिष्ठान चक्र
जल तत्त्व मिळण्यासाठी रसाळ फळे, रसयुक्त भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ आहारात असावेत. कदमताल म्हणजे एकाच जागेवर उभे राहून पाय न आपटता चालणे या व्यायामातून मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर चक्र सक्रिय होऊ शकते.