अध्यात्मशास्त्र : सप्तकोश

अध्यात्म म्हणजे ‘आद्य + आत्मन्‌‍’ म्हणजे ‘आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे’ किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान). अध्यात्म म्हणजे काही विशिष्ट सराव किंवा साधना नव्हे. तो आपल्या अस्तित्वाचा एक निश्चित असा मार्ग आहे. या मार्गक्रमणासाठी मानवी देहरूपी साधन आपणास मिळाले आहे. देह म्हणजे केवळ दृश्य भौतिक शरीर नव्हे.

तैत्तिरीय उपनिषदांमध्ये वर्णिल्याप्रमाणे माणसाचे अस्तित्व सात स्तरांमध्ये असते. त्यापैकी पंचकोश हे शरीर व मनाशी निगडित असतात. पंचकोश : अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. या पंचकोश शरीराला ‘उपाधी’ (आत्मा वाहून नेणारे शरीर) असे म्हटले आहे. व्यक्तीच्या विकासासाठी हे पाचही कोश अत्यंत महत्त्वाचे असतात. या पाच कोशांनंतर येतो तो आत्मा आणि परमात्मा.

अन्नमय कोश म्हणजे भौतिक देह, याला स्थूल देह असेही म्हणतात. पुढील चार कोश म्हणजे प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश, यांना सूक्ष्म देह, ऊर्जा देह किंवा लिंग देह म्हटले जाते. ‘लीनम्‌‍ अर्थं गमयति इति लिड़्‌‍गम’ अर्थात कुठल्याही गोष्टीचे गर्भित ज्ञान करवून देते ते लिंग. उदा. डोळे बघतात, कान ऐकतात, नाक वास घेते, जीभ चाखते, त्वचेला स्पर्श जाणवतो, परंतु त्याचे ज्ञान बुद्धीला व मनाला होते, जे अदृश्य आहेत. स्थूल देहाला जाणीव होते, सूक्ष्म देहाला अर्थ समजतो. हे पंचकोश, शरीर व मनाशी निगडित असून व्यक्तीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यापुढे येतो तो आत्मिक कोश (कारण देह) आणि परमात्मिक कोश (महाकारण देह). हे दोन कोश मुक्ती व मोक्षप्राप्तीचे साधन आहेत.

अध्यात्म 01

शरीर चालविण्यासाठी स्थूल देहामध्ये निरनिराळे अवयव कार्यरत असतात. तसेच सूक्ष्म देहामध्ये सात चक्रे असतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र व सहस्रार चक्र. पहिली पाच चक्रं अनुक्रमे पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व, अग्नितत्त्व, वायूतत्त्व व आकाशतत्त्व शरीरास पुरवितात. आज्ञा चक्रातील महत्‌‍ तत्त्वामार्फत या पंचतत्त्वांचे नियंत्रण साधले जाते, तर सहस्रार चक्राकडून येणारे परम तत्त्व देहास चैतन्य पुरविते. यातील कोणत्याही घटकाची कार्यप्रणाली बिघडली तर शारीरिक किंवा मानसिक रोग उद्भवतात.

स्वयंपूर्ण उपचार हे सप्तचक्रं व पंचतत्त्वांच्या ऊर्जा संतुलनातून, रुग्णास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवून देऊ शकतात.

kosh 01 2

अन्नमय कोश

अन्नमय कोश

अन्नमय कोश म्हणजेच स्थूल शरीर. आईच्या गर्भात असताना तिने खाल्लेल्या अन्नापासून हे निर्माण होते व पुढे अन्नावर पोसले जाते. हे नश्वर आहे. या द्रव्य शरीराला षड्रस अन्नघटकातून ताकद मिळते. ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन होऊन त्यातून सप्तधातूंची (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र/रज) निर्मिती होते, जी हे शरीर चालविण्यासाठी आवश्यक असते. तैत्तिरीय उपनिषदात अन्नालाच ‘शरीराचे औषध’ म्हटले आहे. पंचप्राण आणि अकरा इंद्रिये मिळून एक शरीर तयार होते. यालाच वेदांमध्ये ‘लिंग शरीर’, तर योगशास्त्रात ‘अन्नमय कोश’ म्हटले आहे. स्थूल शरीराला संपूर्ण मानणारी व्यक्ती वस्तूंमध्ये आनंद शोधते. ज्यामुळे खऱ्या आनंदापासून वंचित राहते.

प्राणमय कोश

प्राणमय कोश म्हणजेच ऊर्जादेह. हा सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे. प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचे आवरण असून जगण्यासाठी आवश्यक प्राणाने अर्थात ऊर्जेने बनलेला असतो. अन्नमय कोश अर्थात स्थूल शरीराला यामुळेच प्राण (जीवन) प्राप्त होतो. यामुळेच शरीरास सर्व कर्मं आणि क्रिया करता येतात. मात्र हा आत्मा नाही.

kosh 02 1
kosh 03 2

मनोमय कोश

मनोमय कोश हादेखील सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे. मनोमय कोश हा प्राणमय कोशाचे आवरण असून पाच ज्ञानेंद्रिये (कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक) आणि अंतःकरणाशी (मन) संलग्न आहे. प्रकृतीपासून निर्माण झालेल्या त्रिगुणांपैकी दोन गुण रज (रज हे उत्कटतेने परिपूर्ण असून, इच्छा व आसक्तीपासून जन्माला येते. कृती व आसक्तीद्वारे हे आत्म्यास बांधून ठेवते.) व तम (तम म्हणजे माणसातील अंधकार व क्रूरपणा. अज्ञान व भ्रमापासून हे जन्माला येते. बेपर्वाही, उदासीनता आणि निद्रेने ते आत्म्यास जखडून ठेवते.) यांचे स्थान अंतःकरणात आहे. यामुळेच ‘मी’ व ‘माझे’ ही भावना निर्माण होते. ज्ञानाची इंद्रिये ही मनावर अवलंबून असतात, त्यामुळे निश्चयी अथवा संशयी स्वभाव, प्रेम किंवा तिरस्काराची भावना इथूनच निर्माण होते. ते प्राणमय कोश व्यापून टाकतात, ज्याचा परिणाम अन्नमय कोशावर (शरीर) होतो.

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्परक्रिया व प्रतिक्रिया करत असतात. मानसिक व्याधींमुळे शारीरिक रोग उत्पन्न होतात, तसेच याउलटही होते. जवळजवळ सर्व रोगांचे मूळ मन हेच आहे. ‘मला सर्दी होऊ शकते किंवा अमुक एक व्याधी होऊ शकते’, असे आपले विचार आपल्या शरीराला त्या रोगजंतूंच्या स्वागतासाठी तयार करत असते. कारण जसे विचार, तसा आचार. आणि जसा आचार तसे परिणाम दिसून येतात.

शारीरिक दुखणी ही शरीराच्या कमकुवतपणामुळे असतातच, पण काही वेळा साठवून ठेवलेल्या निरनिराळ्या भावना किंवा आघात आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर प्रभाव पाडतात, ज्यामुळे ते अवयव कमकुवत होऊ शकतात. वेगवेगळ्या भावनांची ऊर्जा ही नाड्यांमध्ये अडथळे निर्माण करते, जी पुढे जाऊन आजारास कारण ठरते.

विज्ञानमय कोश

विज्ञानमय कोश हादेखील सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे. विज्ञानमय कोश हा मनोमय कोशाचे आवरण असून पाच ज्ञानेंद्रिये (कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक) आणि बुद्धीशी संलग्न आहे. शरीराकडून घडणाऱ्या बुद्धिवादी क्रिया, कोणत्याही गोष्टीचे आकलन इथूनच होते. चैतन्य प्रतिबिंबित करण्याची शक्ती यात आहे. जी ज्ञान व कृतीद्वारे प्रगतीत रूपांतरित होते. कृती ही शरीर व अवयवांशी निगडित आहे. मिळणाऱ्या माहितीला अभ्यास व अनुभवांचा निकष लावून जेव्हा त्याचे ज्ञानात रूपांतर होते, तेव्हा ते ऊर्जास्वरूप या कोशात साठते. हा कोश ज्ञानाने संपन्न आहे.

kosh 04 1
kosh 05

आनंदमय कोश

आनंदमय कोश हादेखील सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे. आनंदमय कोश हा विज्ञानमय कोशाचे आवरण असून आनंदातून तयार झालेला आहे. आनंद ही ज्ञानाच्याही पुढची अनुभूती आहे. सर्व रिपूंतून बाहेर पडल्यानंतर जो उरतो तो आनंद. निर्भेळ, निःस्वार्थी आनंद. हा आत्म्याचा आनंद आहे. काही मिळविणे, अनुभवणे यांतून निर्माण झालेली आनंदाची भावना मनोमय कोशात साठते. आनंदमय कोशातील आनंद हा त्याही पलीकडचा आहे. उदा. संत मीराबाई क्लेश सोसूनही आनंदात होत्या. विषाचा प्याला पितानादेखील त्या शांत आणि आनंदीच होत्या. शरीराची नश्वरता ध्यानात आल्यावर आणि परमेश्वरात किंवा प्रकृतीत विलीन झाल्यावर सुख, दुःख, राग, लोभ सारेच संपून जाते आणि उरतो तो आनंद.

वरील पहिले तीन कोश अन्नमय, प्राणमय आणि मनोमय हे शरीर, चेतना व मनाशी निगडित असून, शरीराभोवतीच बांधले गेलेले असतात. शारीरिक व मानसिक दोषांसाठी कारणीभूत असतात. यातून बाहेर पडल्यानंतरच खऱ्या ज्ञानाची अनुभूती होते आणि त्यानंतर मिळतो निखळ आनंद.

आत्मिक कोश (कारण देह)

सहावे आहे आत्मिक शरीर, कारण देह. प्रकृतीपासून निर्माण झालेल्या त्रिगुणांपैकी सत्त्व गुणाचे (सत्त्व हे शुद्ध, प्रकाशमय, रोगमुक्त आहे. हे आत्म्याला आनंद देते आणि ज्ञानाने जोडले जाते.) स्थान येथे आहे.

ज्ञानेश्वर माउली म्हणतात, ‘हे विश्वची माझे घर.’ एवढ्या लहान वयात त्यांना विश्वाची काळजी वाटली. प्रत्येकाला ज्ञान मिळावे, आनंद मिळावा यासाठी त्यांनी कष्ट घेतले, हाल सोसले. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ असे म्हणत मोक्षाची दारे उघडी असतानादेखील संजीवन समाधी घेऊन ते विश्वकल्याणासाठी इथेच थांबले. यात ‘मी’ नाही, अहंकार नाही, काहीही नाही. सर्व काही वैश्विक होते. सर्व माझे आहे, मी सर्वांचा आहे हा अद्वैत भाव विकसित होतो.

kosh 06

पारमात्मिक कोश (महाकारण देह/निर्वाणदेह)

आत्म्याच्याही पुढे येतो परमात्मा. आत्मा परमेश्वरात विलीन होणे म्हणजे परमात्मा. परमेश्वर म्हणजे प्रकाश. आत्म्याचे प्रकाशात विलिनीकरण म्हणजे सातवे शरीर, दैवी शरीर, महाकारण देह. भगवान बुद्धांनी याला ‘निर्वाण-काया’ म्हटले आहे. निर्वाण म्हणजे मोक्ष, पुनर्जन्मापासून मुक्ती. संत-महंत, सद्गुरू जे षड्रिपूंमधून मुक्त झाले, ज्यांना आत्मबोध झाला, त्यांचे निर्वाण होते. रामदास स्वामींनी रचलेल्या गणपतीच्या आरतीत ‘निर्वाणी रक्षावे’ असा उल्लेख आहे.

आपण अन्नमय कोशातच अडकून राहिल्यामुळे आत्मा अनेक जन्मांतून विषय-वासना शमविण्यासाठी फिरत राहतो. एक-एक कोश समजून घेत आत्मज्ञानापर्यंत पोहोचणे म्हणजे ‘अध्यात्म’. प्रत्येक जन्मात आपण ज्ञान घेत एक-एक पायरी पुढे जात असतो.

स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे

अध्यात्मशास्त्र 01

अध्यात्मशास्त्र

अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...

Naturopathy icon 01

निसर्गशास्त्र : पंचतत्त्व

संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...

1011

योगशास्त्र : सप्तचक्रे

मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....

83

मुद्राशास्त्र

मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...

641

मनोविज्ञान

आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...

741

अक्षरब्रह्म

क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!