संकल्पना
तैत्तिरीय उपनिषदांनुसार संपूर्ण चराचर पंचतत्त्वांतून निर्माण झाले आहे. यत्र तत्र सर्वत्र ही पंचतत्त्वे ऊर्जारूप भरून राहिली आहेत. शून्य ऊर्जा, पवन ऊर्जा, सूर्य ऊर्जा, आप ऊर्जा आणि भू ऊर्जा. वेदान्तशास्त्राप्रमाणे प्रत्येक तत्त्वामध्ये स्वतःचा 50% अंश व इतर चार तत्त्वांचा प्रत्येकी 12.5% अंश असतो. ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही, ती केवळ परिवर्तित होते. कोणत्याही तत्त्वांचे प्रमाण जसे बदलते, तशी प्रकृतीतील त्याची संरचना बदलत जाते.
उदा. पाण्यामध्ये अग्नीचा अंश वाढू लागला की त्यातील जलतत्त्व कमी होऊन त्याचे वायूमध्ये (बाष्प) रूपांतर होते. जर पाण्यातील अग्नीचा अंश कमी होऊ लागला तर त्यातील पृथ्वीचा अंश वाढू लागतो व त्याचे बर्फात रूपांतर होते. बाष्पातील जल वाढू लागले की त्याचे पाण्यात रूपांतर होते. बर्फातील अग्नी वाढू लागला की पाणी बनते.
मानवी देहदेखील पाच तत्त्वांपासून बनलेला आहे. या देहातील पाच तत्त्वांचे असंतुलन हे आजारास किंवा दोषास कारणीभूत असते. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे देहातील पाच तत्त्वं संतुलित करण्याची क्रिया केली जाते. देहास आवश्यक असणारी ऊर्जा निसर्गातून पुरविली जाते व अतिरिक्त साठलेली ऊर्जा निसर्गात मुक्त केली जाते. ज्यामुळे मानवी देह संतुलित होऊन त्यास आरोग्य मिळू शकते.