विशुद्ध चक्र मेरुदंडावर कंठस्थानी असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते. हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून आकाशतत्त्व शरीरास पुरविते. आकाश सर्वव्यापी आहे. आकाशातून इतर तत्त्वांची उत्पत्ती असल्यामुळे, ते सर्वांचे मूळ आहे. यात इतर चारही तत्त्वे सुप्तावस्थेत असतात. शरीरातील कोणत्याही अवयवातील किंवा पेशीतील रिक्त अथवा पोकळ जागी आकाश तत्त्व उपस्थित असते. जसे की, आतडी, मूत्राशय, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या, फुप्फुसे इ. आकाश तत्त्वाने भरलेली असतात. इतर तत्त्वांना ये-जा करण्यासाठी हे अवकाश आवश्यक असते.
पुराणात डोक्याला स्वर्ग, कंठाला क्षितिज आणि शरीराला पृथ्वी असे रूपक दिले आहे. कोणतेही विष जर पृथ्वीकडे गेले तर शरीराचा नाश किंवा वर स्वर्गाकडे गेले तर मेंदूचा नाश होऊ शकतो. म्हणूनच कोणत्याही कटू शब्दाचे, वाईट अनुभवाचे विष कंठात धारण केले पाहिजे. जे पोटाकडे गेले तर पोटशूळ, कोंडमारा आणि डोक्याकडे गेले तर डोकेदुखी, मनस्ताप होतो, सूडभावना निर्माण होते. अशा वेळी नामजपाने या विषाला विशुद्ध चक्रात शुद्ध करावे. विशुद्ध चक्र हे शरीरातील शुद्धीचक्र आहे. याचा रंग निळा आहे.
निर्मिती हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. विचारांची निर्मिती, कलेची निर्मिती, गर्भाची किंवा पेशींची निर्मिती व बदल आकाशतत्त्वामुळे घडतात. ज्याचे विशुद्ध चक्र सक्षम असते ती व्यक्ती कलाकार, यशस्वी राजकारणी व व्यावसायिक उद्योजक होऊ शकते. विशुद्ध चक्र कमकुवत झाल्यास, संसर्गजन्य विकार, विचारशून्यता इत्यादी समस्या उद्भवतात. तर विशुद्ध चक्र अतिसक्रिय झाल्यास ऑटोइम्युन डिसीज, अतिविचार व वायफळ बडबड अशा व्याधी उद्भवू शकतात.
ध्यान - विशुद्ध चक्र
आकाशतत्त्व मिळण्यासाठी खरबुजासारखी भुसभुशीत गर असणारी फळे, हिरव्या पालेभाज्या तसेच औषधी वनस्पती जसे की मेथी, हळद इ. आहारात असाव्यात. सर्वांगासन, उत्तानासन यामुळे विशुद्ध चक्र संतुलित होण्यास मदत होते.