विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य
बहुतांश रोग व अपयशाचे मूळ कारण असते अयोग्य विचार. आजच्या वेगवान जगात सर्वात जास्त उणीव भासते अशी गोष्ट म्हणजे मनःशांती. दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या औचित्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील लोकमंगल मुख्यालयात निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका व ऊर्जा उपचारक सौ. अमृता चांदोरकर यांचे मानसिक आरोग्यावर व्याख्यान झाले.
या प्रसंगी बँकेचे पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर विभागीय कार्यालयतील कर्मचाऱ्यांनी दूरस्थ पद्धतीने हजेरी लावली. सौ. चांदोरकर म्हणाल्या की ताण हा वाईट नसतो. ताणलेली गोष्ट योग्य वेळेत सोडली, तर ती उद्दीष्ट गाठते. ताणातून निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे अनेक संधी पुढे येऊ शकतात. मात्र ताण जर तसाच धरून ठेवला, तर तो आपली क्षमता (तन्यता) कमी करतो. मन हे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही विचारांचे उगमस्थान असते, ज्यातून आचारण (कर्म) घडते. सकारात्मक विचार विधायक असतात, तर नकारात्मक विचारांतून शंका, आजार व अपयश येते.