योग व प्राचीन ज्ञानाचे आरोग्यरक्षणातील महत्त्व
कालातीत अशा प्राचीन भारतीय ज्ञानाचे आरोग्यरक्षण व सर्वांगीण प्रगतीतील महत्त्व अलीकडच्या काळात पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. सकाळ वृत्त समूहाच्या स्वास्थ्यम् उपक्रमांतर्गत दीर्घकालीन आरोग्यरक्षणासाठी व्याख्यानांची एक मालिका जून २०२३ पासून पुण्यात सुरू करण्यात आली आहे. निरामय वेलनेस सेंटरची यामध्ये ‘ऊर्जा पार्टनर’ म्हणून महत्त्वाची भूमिका आहे. या मालिकेतील पहिले व्याख्यान २१ जून (आंतरराष्ट्रीय योग दिन) रोजी कोथरूड, पुणे येथे झाले. या वेळी डॉ. भूषण पटवर्धन, अध्यक्ष, इंटरडिसीप्लीनरी आयुष आर & डी, कोविड-१९ टास्क फोर्स, यांनी ‘समृद्ध प्राचीन ज्ञानाचे आजच्या काळातील महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. डिसेंबर २०२३ पर्यंत अशी एकूण १४ व्याख्याने होणार आहेत.
या प्रसंगी बोलताना सौ. अमृता चांदोरकर, संचालक, निरामय वेलनेस सेंटर यांनी उपस्थितांशी ‘योग, आरोग्य आणि स्वास्थ्य’ या विषयावर संवाद साधला. शाश्वत आनंदापर्यंत पोहोचण्यात उपयोगी ठरणा-या अष्टांगयोगाच्या आठ पायऱ्यांचा त्यांनी उल्लेख केला. आपल्या आतील प्रकाशाभोवती जमलेल्या चुकीच्या विचारांची काजळी दूर केल्यास चिरकाल टिकणारे स्वास्थ्य मिळू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या वेळी निरामयची भारतीय पंचांगावर आधारित ‘समय निरामय’ ही वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका वितरित करण्यात आली.