मूलाधार चक्र मेरुदंडाच्या तळाशी गुदद्वाराजवळच्या शिवणीवर असून याचे तोंड जमिनीच्या दिशेने असते. हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून पृथ्वीतत्त्व शरीरास पुरविते. निसर्गातील सर्व टणक भागांमध्ये प्रमुख तत्त्व हे पृथ्वी असते. पृथ्वीतत्त्वामुळे कुठल्याही वस्तूला आकार मिळतो. शरीरातील कठीण भाग जसे की, हाडे, अस्थिबंध, स्नायुबंध, त्वचा, केस, दात, कूर्चा तसेच पेशी/शिरा/वाहिन्यांचे आवरण, मज्जातंतू इत्यादीमध्ये पृथ्वीतत्त्वाचा मुख्य कार्यभाग असतो.
मूलाधार चक्र हे शरीरातील आधार चक्र आहे. याचा रंग लाल आहे. स्थिरता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता या चक्रावर अवलंबून असते. शरीराची प्रतिकारशक्ती, नवीन पेशींची निर्मिती, अनावश्यक गोष्टींचे उत्सर्जन तसेच रक्तोत्पादन व रक्ताची गुणवत्ता राखणे ही महत्त्वाची कार्ये मूलाधार चक्र करते. सर्व कर्मे स्मृतीस्वरूप मूलाधार चक्रात साठविली जातात. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, आपले विचार मांडण्याची हातोटी, धाडसी व क्षमाशील वृत्ती मूलाधार चक्रात स्थित शक्तींमुळे मिळते. मूलाधार चक्र सक्षम असणारी व्यक्ती कणखर, काटक, निर्णयक्षम व व्यवहारी असते. मूलाधार चक्र कमकुवत झाल्यास, शरीराला पृथ्वीतत्त्व कमी पडू लागते. हाडे ठिसूळ होणे, हाडांची झीज, स्नायू व शिरा कमकुवत होणे, आत्मविश्वासाची कमतरता, नैराश्य इत्यादी समस्या उद्भवतात. तर मूलाधार चक्र अतिसक्रिय झाल्यास हाडे किंवा स्नायू कडक होणे, शिरा ताठ होणे, हाड वाढणे, अतिआत्मविश्वास, अव्यवहारी वृत्ती अशा व्याधी उद्भवू शकतात.
ध्यान - मूलाधार चक्र
सर्व धान्ये (उदा. तांदूळ, गहू, डाळी इ.), सर्व जमिनीत येणाऱ्या भाज्या/कंद (उदा. गाजर, बटाटा इ.), घट्ट आणि गोड गर असणारी फळे यातून शरीरास पृथ्वीतत्त्व मिळते. बैठका (दोन पायांत अंतर ठेवून उठाबशा काढणे) किंवा अर्ध बैठका मारणे या व्यायामानेदेखील मूलाधार चक्र सशक्त होण्यास मदत होऊ शकते.