मासिक पाळीवर बोलू काही...
पुण्यातील पौड-मुळशी भागात असणाऱ्या झील स्कूल येथे नुकतेच निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका सौ. अमृता चांदोरकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानाचा विषय होता, मासिक पाळीविषयी जनजागृती.
शालेय वयातील मुलींना त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाची अगदी सोप्या शब्दांत माहिती दिली. आजची मुलगी ही उद्याची माता असते. मात्र स्त्री बनण्याच्या या प्रक्रियेत हल्ली अनेक अडथळे येत आहेत. मुलींना अगदी लहान वयातच पाळी सुरू होते. पाळीदरम्यान निरनिराळ्या समस्या असणाऱ्या मुलींची संख्याही अधिक आहे. खरंतर स्त्रीचे संपूर्ण आरोग्य मासिक पाळीभोवती फिरत असते. त्यामुळे अशा या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी मुलींशी आणि त्यांच्या मातांशी अगदी हसतखेळत संवाद साधला. मुलींनीही संकोच न करता, मोकळेपणाने प्रश्न विचारले. आपल्या प्राचीन शास्त्राने याविषयी सांगितलेल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहीतदेखील नाहीत, त्या या कार्यक्रमातून अमृता चांदोरकर यांनी मुलींसमोर मांडल्या. प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम खूप रंगला.
आपणही आपल्या प्राचीन शास्त्राची माहिती करून घेतली तर भविष्यकाळात मुलींचं आणि स्त्रियांचं आरोग्य तर चांगलं राहीलच, शिवाय IVF सारख्या ट्रीटमेंटची गरजही भासणार नाही, असेही त्यांनी विषयाचा समारोप करताना नमूद केले.