मणिपूर चक्र मेरुदंडावर नाभीस्थानी असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते. हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून अग्नीतत्त्व शरीरास पुरविते. अग्नी हा निसर्गातील तेजाचे प्रतीक आहे. अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम अग्नी करतो. पचन आणि चयापचय प्रक्रियेमधील ‘अग्नी’ हा महत्त्वपूर्ण घटक आहे. खाल्लेले अन्न पचविणे, शोषणे व रूपांतरित करणे ही कार्ये अग्नीद्वारे केली जातात. शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी जसे की, पोषण, ताकद, वासना, कांती, जगण्याची ऊर्मी, आरोग्य, ओज आणि तेज या सर्वांसाठी अग्नी कारणीभूत असतो.
मणिपूर चक्र हे शरीरातील चैतन्य चक्र आहे. याचा रंग पिवळा आहे. रूपांतरण हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. चरक ऋषींनी नमूद केल्याप्रमाणे, शरीरात १३ प्रकारचे अग्नी आहेत. १ जठराग्नी, ७ प्रकारचे धत्वाग्नि आणि ५ प्रकाराचे भूताग्नी. आपण सेवन केलेले अन्न प्रथम जठराग्नीमार्फत पचविले जाते व धातूंच्या सारात रूपांतरित होते. त्यानंतर पाच भूताग्नी त्याचे रूपांतर पाच तत्त्वांमध्ये करतात. ज्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी ऊर्जा/शक्ती मिळते. ज्याचे मणिपूर चक्र सक्षम असते ती व्यक्ती कर्तृत्ववान असते. मणिपूर चक्र कमकुवत झाल्यास, शरीराला अग्नीतत्त्व कमी पडू लागते. ज्यामुळे भूक न लागणे, अपचन, जुलाब, अन्नपदार्थांची अॅलर्जी, जलोदर, कमी रक्तदाब तसेच निरुत्साह इत्यादी समस्या उद्भवतात. तर मणिपूर चक्र अतिसक्रिय झाल्यास खाल्लेले अंगी न लागणे, पित्तविकार, फॅटी लिव्हर, कावीळ, अल्सर, बद्धकोष्ठता, जास्त रक्तदाब तर अतिउत्साह, गोंधळलेला स्वभाव अशा व्याधी उद्भवू शकतात.
ध्यान - मणिपूर चक्र
अग्नीतत्त्व मिळण्यासाठी आहारात आलं, लसूण, काळी मिरी, लवंग, दालचिनी, खनिज मीठ, समुद्री मीठ यांचा समावेश करावा. जेवणानंतर शतपावली व वज्रासनाने मणिपूर चक्राचे कामकाज तसेच पचनक्रिया सुरळीत होते.