प्राचीन शास्त्र
प्राचीन शास्त्र - डॉ. योगेश चांदोरकर
प्राचीन शास्त्र , भारतवर्षामध्ये तत्त्वविचारांची एक अखंड आणि अतिशय समृद्ध परंपरा चालत आलेली आहे, जिने हजारो वर्षांपासून भारताचा गौरवशाली स्वतःमध्ये सामावून घेतलेला आहे. या अविरल धारेमध्ये अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांचा समावेश झालेला दिसतो.
या प्राचीन भारतीय ज्ञानगंगेने अनेक उत्तमोत्तम तत्त्वज्ञ, गणितज्ञ, संशोधक, साहित्यिक अशा ऋषीमुनींना जन्म दिला आणि आपल्या ज्ञानधारेने त्यांचे पोषण केले. त्यांचे कार्य आणि संशोधनामुळे भारतीय ज्ञानगंगेचा हा विशुद्ध प्रवाह संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त झाला. सर्वांत प्राचीन अशा वैदिक शास्त्रामध्ये जे सुप्त आणि सूक्ष्म ज्ञान आहे ते प्रत्येक युगामध्ये प्रासंगिक ठरलेले आहे.
यामध्ये तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र किंवा सृष्टीतील अन्य कोणत्याही विषयाचा समावेश केला जाऊ शकतो. या ऋषीमुनींचा अभ्यास विषय केवळ ईश्वर आणि परमसत्य एवढाच नसून मानवी जीवनाच्या विविध अंगांचाही त्यांनी प्रकर्षाने विचार केला होता. त्यामुळेच भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान, जीवनाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
आपल्या पूर्वजांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी हे महान कार्य करून, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक राजमार्ग तयार करून ठेवलेला आहे. परंतु आज आमच्या अज्ञानामुळे आम्ही ज्ञानाच्या या महान खजिन्याची नासाडी करत आहोत. या प्राचीन ज्ञानाचे महत्त्व कमी होण्याचे आणि नवीन पिढी या ज्ञानप्रति उदासीन असण्याचे कारण हेच आहे की, या प्राचीन परंपरा, संस्कृती, ज्ञान आणि जीवन पद्धतीमागील वैज्ञानिक दृष्टिकोण आज त्यांना मिळत नाही. आजची पिढी त्यांना सांगितलेल्या कोणत्याही कामाचे कारण जाणून घेण्यावर अधिक जोर देते आणि जेव्हा त्यांना त्याचे तर्कशुद्ध उत्तर मिळत नाही, तेव्हा ते त्या परंपरेचे पालन करत नाहीत. त्याचप्रमाणे जुन्या पिढीकडेही यावर कोणतेही उत्तर नसते कारण त्यांनाही त्या परंपरेमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन माहिती नसतो.
भारतीय तत्त्वज्ञान हे नेहमीच जगासाठी दिशादर्शक राहिलेले आहे आणि त्याने वास्तविकता व सत्य जाणून घेण्यासाठी नेहमीच अध्यात्माचा मार्ग सांगितलेला आहे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या मानव कल्याणाच्या या अविरत धारेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने निरामय संस्थेचे संस्थापक श्री. योगेश चांदोरकर यांनी प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन आणि त्याच्याशी संबंधित शास्त्रामध्ये दडलेल्या विज्ञानाचा अभ्यास करून त्यातून उमगलेले सत्य ‘प्राचीन शास्त्रांमागील शास्त्र’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि विशेषतः तरुण पिढीच्या मनात आपल्या प्राचीन संस्कृतीप्रति आदर निर्माण करण्याचा ते विशेष प्रयत्न करत आहेत.