मानवाच्या स्वास्थ्यात आहार, विहार व दिनचर्या या साऱ्याची भूमिका असते, हे आपण जाणतोच. पण, हा आहार-विहार काही नियमांनी बद्ध असेल, आहाराबरोबरच रोजच्या जगण्याला ध्यान-धारणा व व्यायाम यांची जोड असेल, तर सर्वांगीण स्वास्थ्य मिळविणे सहज शक्य होते. हे सर्वांगीण स्वास्थ्य मिळविण्यासाठी काय करायला हवे, हेच या ‘निरामय जीवन’ सूत्र दैनंदिनीत सांगितले आहे. सकाळी अंथरुणावरून कसे उठावे, कुठली प्रार्थना म्हणावी, कुठले हलके व्यायाम करावेत, प्रातर्विधीनंतर स्नान कसे करावे, मन:शांतीसाठी ध्यान-धारणा का करावी, आहार कसा असावा, दिवेलागणीला दिवा का लावावा व त्याने काय लाभ होतो, किमान संध्याकाळी सर्वांनी एकत्र भोजन का करावे, रात्री झोपण्यापूर्वी कुठली प्रार्थना म्हणावी अशा दिनचर्येतील विविध घटकांचा आपल्या एकूण शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होतो, याचा खुलासा ‘निरामय जीवन’ सूत्र दैनंदिनीत वाचायला मिळेल.
ही सर्व सूत्रे आचरणात आणली की त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार हे नक्कीच! पण, हा बदल प्रत्यक्ष अनुभविण्याबरोबर कागदावर उतरलेला पाहाणे हेही तितकेच आनंदाचे असते, ज्यामुळे कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो हे एका नजरेत स्पष्ट होते. हे सर्व नोंदविण्याची सोय या अनोख्या दैनंदिनीत आहे. हा सर्व सूत्रबद्ध कार्यक्रम पाच महिन्यांचा आहे. आपण रोज आपल्यात होणाऱ्या बदलांची नोंद या दैनंदिनीत तारखेनुसार करायची आहे. सदर कालावधी पूर्ण झाला की सुरुवात आणि शेवट यादरम्यानच्या नोंदी आपल्याला खूप मोठा आनंद देऊन जातील आणि एक लक्षणीय टप्पा पार केल्याचे समाधानही मिळेल. ही दिनचर्या आपल्या जीवनाचा भाग कधी बनली हे तुम्हाला कळणारही नाही इतके ते सहज होऊन जाईल. याचसाठी आपल्यासोबत हवी ‘निरामय जीवन’ सूत्र दैनंदिनी!