शुद्ध ऊर्जेचे मूर्त स्वरूप म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे स्त्री. कोणतीही निर्मीती आदीशक्तीच्या गर्भातूनच होत असते. शक्तीपासून संपूर्ण चराचराला प्रेरणा आणि क्षमता प्रदान केली जाते. शक्तीबरोबर शिव जोडला गेला की संपूर्ण सृष्टी संतुलित होते. मात्र जर त्यांमध्ये बेबनाव झाला तर अधोगती होते. ते संतुलित करण्यासाठी या शक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र.
स्वतःमधील शक्ती जागवायची असेल तर आधी त्यावर चढलेली काजळी स्वच्छ करणे आवश्यक असते. शरीराची अंर्तस्वच्छता आणि मनाची स्वच्छता करण्यासाठी नवरात्रीत उपवास सांगितलेले आहेत. उपवास म्हणजे लंघन आणि परमेश्वर भक्ती.
हा काल पर्यावरण बदलाचा असल्यामुळे शरीरात पित्त वाढत असते. नऊ दिवसांच्या लंघनातून शरीराची अंर्तस्वच्छता होते, सर्व दोष/विकृती दूर होतात. फलाहार आणि सात्त्विक आहारातून शरीराचे योग्य पोषण होते. ध्यान, आराधनेतून मनाची स्वच्छता होते आणि भक्तीतून मनाचे सत्त्व वाढते. होम-हवन, यज्ञामुळे वातावरणातील जीवजंतू नष्ट होतात. अनवाणी चालल्यामुळे भूमातेची ताकद (पृथ्वी तत्त्व) आपल्याला मिळते.
शारदीय नवरात्र हा एक कृषीविषयक सणही आहे. घटस्थापनेला 9 घटांमध्ये शेतातील मातीत लावलेल्या 9 धान्यांची होणारी वाढ, यावरून या हंगामाला कोणते धान्य शेतात पेरावे हा निसर्गाचा संकेत शेतकऱ्याला कळतो.
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणामागे केवढा मोठा अर्थ लपलेला आहे हेच यातून आपल्याला समजते. म्हणूनच वर्षभराच्या ऊर्जेची बेगमी या नवरात्रीच्या सणाला करायलाच हवी…
धन्यवाद