दसरा (विजयादशमी)

महिष शब्दाचा अर्थ आहे विद्वान. विद्वत्तेतून अहंकार जन्माला येतो आणि महिषाचा महिषासुर होतो. असुषु रमन्ते इति असुरः। म्हणजेच जो केवळ जीवनाचा उपभोग घेण्यात व वस्तूचा आनंद घेण्यात मग्न असतो तो असुर आणि असा महिषासुर प्रत्येक मानवी हृदयात असतो. या महिषासुरावर विजय मिळविणे म्हणजे विजयादशमी.

विजयाशी निगडीत अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेला पराक्रमाचा, पौरूषाचा सण म्हणजे विजयादशमी. दहांचं (रावणाचं) हरण करून प्रभू रामचंद्रांनी फडकवलेली विजयपताका म्हणजे दशहरा (दश+हरा). याच दिवशी अज्ञातवास संपवून पांडवांनी शमी वृक्षामध्ये लपविलेली शस्त्रं धारण केली. नऊ दिवस चाललेल्या अथक युद्धानंतर दसऱ्याला दुर्गेने महिषासुराचे निर्दालन केले.

नवरात्रीत स्वतःमधील महिषासुराच्या विनाशासाठी दुर्गापूजा, शारीरिक, मानसिक, आर्थिक दुःख निवारणासाठी लक्ष्मीपूजा आणि ज्ञानप्राप्तीसाठी सरस्वतीपूजन केले जाते. नऊ दिवस निराहार राहून, निरंकार होऊन, जपतपादी आराधना आणि यज्ञ करून केलेल्या शक्तीच्या उपासनेमुळे दाही दिशा शक्तीने भारून गेलेल्या असतात. या दाही दिशांवर मिळविलेला विजय म्हणजे विजयादशमी.

विजयादशमीच्या दिवशी रघुराजाच्या (प्रभू रामांचे पूर्वज) नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर इंद्राच्या आदेशानुसार कुबेराने सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. कौत्साने त्यातील 14 कोटी सुवर्ण मुद्रांची गुरूदक्षिणा दिली आणि उरलेले सोने रघुराजाने प्रजेस वाटले. म्हणूनच विजयादशमीला आपट्याची पाने परस्परांना दिली जातात. याला सोने लुटणे असे म्हणतात.

आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक म्हणतात. अश्माचा अंत करणारा, माळरानावर उगवणारा असा हा आपटा शरीरातील मूतखडा नष्ट करतो. दाह, तृष्णा आणि प्रमेहासारख्या आजारात उपयुक्त असून पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. (संदर्भ : धन्वंतरी निघण्टू)

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेऊन त्याची प्रार्थना केली जाते. दसऱ्याला शस्त्रांची पूजा करताना त्यावर शमीपत्रे वाहतात. शमी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. शमीच्या लाकडाचा उपयोग इंधनासाठी होतो. ही लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून यज्ञकर्मात शमीच्या समिधा वापरतात. झाडाचे पाने, झाडावर तसेच पानांवर येणाऱ्या गाठी, शेंगा औषधी असतात. दुर्वांप्रमाणेच शमी शरीरातील कडकीचा नाश करते.

पूजेत वापरली जाणारी सर्व फुले, पाने व वनस्पती ही औषधी असततत. दुसऱ्या दिवशी देवाला अंघोळ घालताना हे सर्व निर्माल्य जेव्हा ताम्हनातील पाण्यात काही वेळ रहाते, त्यातील औषधी गुण त्या पाण्यात संमिलीत होतात. पूजा करताना होणाऱ्या मंत्रोच्चाराने ते पाणी भारीत होते आणि हे पळीभर पाणी औषधाचे काम करते.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. मुहूर्त म्हणजे शुभ काम योग्य काळ. जेव्हा तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाचही अंगे शुभ असतात. हा शुभ दिन आपल्याला उपयुक्त आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन शिकवीतो. लक्ष्मी बरोबर सरस्वतीचे महत्त्व दाखवितो. विद्या विनयेन शोभते हे शिकवीतो.

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण म्हणजे संपूर्ण सृष्टीचे जतन, संवर्धन आणि संतुलन. यात प्रत्येकाने सहभागी व्हायलाच हवे.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!