Team Niraamay
श्री. योगेश चांदोरकर
निसर्ग उपचारक
निरामय वेलनेस सेंटरचे संचालक श्री. योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांना मूलतः अध्यात्माची आवड होती. कर्मधर्मसंयोगाने आध्यात्मिक पुस्तकांच्या डिटीपीचे कामही त्यांच्याकडे येऊ लागले आणि माहितीचा आयाम वाढत गेला. प्राणशक्तीची ओळख त्यांना करून दिली, ती त्यांचे गुरुमित्र श्री. प्रद्युम्न वाटवे यांनी. शरीर व मन सचेतन करणारी ‘ऊर्जा’च आरोग्य किंवा अनारोग्यास कारणीभूत ठरते हे सत्य उलगडत गेले. आणि तिथून सुरू झाले प्रयोग…
1999 सालापासून योगेश सरांनी निःस्वार्थीपणे ऊर्जेमार्फत रुग्णोपचारास सुरुवात केली. रुग्णांच्या घरी जाऊन किंवा इस्पितळात जाऊन ते उपचार करीत असत. वाचून, ऐकून मिळालेली माहिती ही वेगवेगळ्या प्रयोगातून व अनुभवातून ज्ञानात परिवर्तित होत गेली…
पुढे 2000 साली योगेश सरांच्या आई श्रीमती शैलजा चांदोरकर यांना तीव्र हृदयरोग उद्भवल्यामुळे इस्पितळात दाखल करावे लागले. ब्लॉकेजेस असल्यामुळे ओपन हार्ट सर्जरीशिवाय पर्याय नव्हता. ऑपरेशनशिवाय केवळ 1 महिन्याची मुदत तेथील डॉक्टरांनी दिली होती. मात्र योगेश सरांवर विश्वास ठेवून त्यांच्या आईंनी ऑपरेशन न करण्याचे ठरविले आणि तिथून सुरू झाला खरा संघर्ष…
सरांच्या आईंना मुलाच्या यशासाठी बरे व्हायचे होते, तर योगेश सरांना आईंचा विश्वास सार्थ करायचा होता. ऊर्जा ही अशी शक्ती आहे, जी तुमच्या विचारांचा मागोवा घेत जाते. उपचार आणि विचार, दोन्हीमुळे सरांच्या आई पूर्ण कार्यरत झाल्या. सर्व गृहकृत्य, प्रवास इ. व्यवस्थित करू लागल्या. तसेच इतर रुग्णांना उपचारही देऊ लागल्या. योगेश सरांनी हे सेवाकार्य पूर्णवेळ स्वीकारावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
या सर्व प्रवासात अमृता मॅडम या योगेश सरांच्या सहकारी म्हणून बरोबर होत्या. 2005 साली ते दोघे विवाहबद्ध झाले. योगेश सर हे बुद्धिवादी तर अमृता मॅडम या मनोवादी. ऊर्जेचा अभ्यास करताना, दोघांच्या एकत्रित विचारधारेतून उत्पत्ती झाली आधुनिक ‘स्वयंपूर्ण उपचारां’ची…
उपजीविकेसाठी डिटीपी, डिझाइंनिंगचा व्यवसाय आणि सेवाकार्याची आवड म्हणून उपचार सुरू होते. पुढे-पुढे उपचारांसाठी वेळ कमी पडू लागला. रुग्णाच्या घरी त्याचे आप्तेष्टदेखील उपचार घेण्यासाठी येऊ लागले. व्यवसायास वेळ देता येईना, त्यामुळे आर्थिक ताण येऊ लागला…
त्याचवेळी सरांच्या आई , मराठे आजी (अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेतून पूर्ण बऱ्या झालेल्या रुग्ण) आणि रिसबूड काकू (दंडाचे मोडलेले हाड चुकीचे बसविले गेल्यामुळे होणाऱ्या प्रचंड त्रासातून बऱ्या झालेल्या रुग्ण) हे योगेश सरांनी ‘उपचार केंद्र’ सुरू करावे याबद्दल खूपच आग्रही होते. सर्वांच्या मताचा आदर करून शनिपार चौकातील ‘महालक्ष्मी मार्केट’ या इमारतीत भाड्याने छोटी जागा घेण्याचे ठरले. पैशांची वानवा होती. मात्र रिसबूड काका, कामत काका, सुनिल दंडवते आणि प्रज्ञा भावे यांनी ‘जमतील तेव्हा पैसे परत करा’ म्हणत निरपेक्ष मदत केली. आणि सुरुवात झाली नवीन पर्वाची…
11 फेब्रुवारी 2010 रोजी ‘निरामय वेलनेस सेंटर’ची सुरुवात झाली. प्रत्येक उपचाराचे रुपये 50/- घेण्याचे ठरले. उपचारप्रणालीची संपूर्ण माहिती देण्याचे काम अमृता मॅडमनी आणि उपचार करण्याचे काम योगेश सरांनी वाटून घेतले.
सुरुवातीला परीक्षा घेणारेच जास्त येत होते. अनेकांनी अविश्वास दाखविला, तोंडावर नावं ठेवली. अंधश्रद्धा निर्मूलनवालेही येऊन गेले. चिकित्सक पुणेकरांनी भंडावून सोडले. मात्र प्रत्येक वेळी सर आणि मॅडमनी, रुग्णांचे अनुभव आणि त्यांना झालेले ज्ञान सोप्या भाषेत समजवून सांगण्याचा प्रयत्न केला.
‘अणू-रेणू’ डोळ्यांना दिसत नसूनही तुम्ही मान्य करता, मग ‘पंचमहाभूतां’वर तुमचा आक्षेप का? सॅटेलाईटमार्फत लहरींचा होणारा विश्वप्रवास जर तुम्हांस पटतो तर या ऊर्जालहरींवर शंका कशी? असे प्रश्न विचारले.
दृश्य आणि अदृश्य अशा या जगात दृष्य भाग कमी असून अदृश्य भाग जास्त आहे याची जाणीव करून दिली. कोणताही ‘चमत्कार’ निसर्ग नियमांप्रमाणेच होत असतो, मग ‘स्वयंपूर्ण उपचारां’मागील निसर्गनियम समजून न घेता त्यास अंधश्रद्धा म्हणणे अयोग्य आहे – हे निक्षून सांगितले. त्याच वेळी बरे झालेले रुग्णही ‘स्वयंपूर्ण उपचारां‘चा प्रचार व प्रसार करीत होते. 26 एप्रिल 2010 रोजी ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या मुक्तपीठ पुरवणीत छापून आलेला मराठे आजींचा स्वानुभव या प्रवासाला कलाटणी देणारा ठरला…
विनाऔषध-विनास्पर्श दिले जाणारे हे ऊर्जा उपचार आजही अनेकांना गूढ वाटतात. कारण आपण आधुनिक शास्त्रावर पूर्णपणे विसंबलो आहोत. मागील पिढीकडून मिळालेले तत्त्वज्ञान (प्राचीन शास्त्र) हे चराचराचे ज्ञान असून ते विसरून गेलो आहोत.
योगेश सर व अमृता मॅडमनी निसर्गोपचार आणि ऊर्जा (योगशास्त्र) विषयाचा अभ्यास करताना, आधुनिक जीवनशैलीशी याची कशी सांगड घालता येईल, याचा विचार केला. निसर्गोपचारतज्ज्ञ असणारे श्री. योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांनी प्राचीन शास्त्रांचा केलेला आधुनिक आविष्कार म्हणजे ‘स्वयंपूर्ण उपचार’. निरामय वेलनेस सेंटरमध्ये असाध्य आजारांवर ‘संजीवनी’ ठरणारे हे स्वयंपूर्ण उपचार रुग्णांना 24×7 मिळतात. त्यासाठी मनापासून सेवा देणाऱ्या उपचारकांची मोठी फळी येथे सतत कार्यरत आहे.
सेवा परमो धर्मः। हेच आमचे ब्रीद आहे.
धन्यवाद
सौ . अमृता चांदोरकर
निसर्ग उपचारक
स्वतःला निरोगी राखण्याची विलक्षण शक्ती निसर्गाकडे आहे. मानवी देह हादेखील निसर्गाचाच एक भाग. स्थूल देह आणि सूक्ष्म देह असे याचे वर्गीकरण होते. स्थूल देह निसर्गातील स्थूल/जड गोष्टींवर (अन्न) पोसला जातो, तर सूक्ष्म देह निसर्गातील सूक्ष्म गोष्टींवर (ऊर्जा) पोषित होतो. ‘मन’ हे सूक्ष्म देहाचा भाग असून स्थूल देहाला प्रभावित करते. योग्य आहार, योग्य विहार (सद्वृत्तीने परिस्थितीनुरूप केलेले आचरण) आणि योग्य विचार माणसास निरोगी ठेवतात.
स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे
अध्यात्मशास्त्र
अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...
निसर्गशास्त्र : पंचतत्त्व
संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...
योगशास्त्र : सप्तचक्रे
मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....
मुद्राशास्त्र
मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...
मनोविज्ञान
आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...
अक्षरब्रह्म
क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...