अनाहत चक्र मेरुदंडावर हृदयस्थानी असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते. हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून वायूतत्त्व शरीरास पुरविते. वायू हा निसर्गातील हालचालींचे प्रतीक आहे. आपल्या शरीरातील कोणतीही हालचाल
वायूमुळे घडते. वायू जेव्हा नाड्यांमधून मुक्त प्रवाहित होतो, तेव्हा स्नायू, मज्जातंतू, पेशी, अवयव आणि शरीरातील सर्व भागांना पोषण, चैतन्य, चालना आणि सर्वसमावेशक आरोग्य प्रदान करतो. अनाहत चक्राला शक्तिकेंद्रही संबोधले जाते. ज्याचे अनाहत चक्र सक्षम असते ती व्यक्ती स्वार्थ आणि परमार्थाचा समतोल राखू शकते.
अनाहत चक्र हे शरीरातील भावचक्र असून, याचा रंग हिरवा आहे. गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. प्रत्येक तत्त्वाचा एकमेकांशी समन्वय वायूमुळे प्रस्थापित होतो. प्राण ही जीवनशक्ती वायूपासून मिळते. शरीरात पंचप्राण असतात. ‘प्राण’ हा ऊर्जेचा प्रवाह छातीच्या भागात, ‘अपान’ हा नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात, ‘समान’ हा हृदयापासून नाभीपर्यंतच्या प्रदेशामध्ये, ‘उदान’ हा मानेपासून डोक्यापर्यंतच्या भागात तर ‘व्यान’ हा संपूर्ण शरीरभर सर्व प्राणांशी समन्वय साधतो आणि त्यांना शक्ती प्रदान करतो. याव्यतिरिक्त ढेकर आणि उचकी, डोळ्यांची उघडझाप, तहान, भूक, खोकला, शिंक, जांभई व झोप, चलन-वलन, आकुंचन प्रसरण वायूमुळे घडते. अनाहत चक्र कमकुवत झाल्यास, शरीराला वायू तत्त्व कमी पडू लागते. ज्यामुळे अकार्यक्षम हृदय, कमकुवत फुप्फुसे, शारीरिक व मानसिक थकवा, मरगळ इत्यादी समस्या उद्भवतात. अनाहत चक्र अतिसक्रिय झाल्यास वातविकार, हृदयाची अतिसक्रियता, फुप्फुसाचे विकार, स्वार्थी स्वभाव, काल्पनिक भीती अशा व्याधी उद्भवू शकतात.
ध्यान - अनाहत चक्र
वायूतत्त्व मिळण्यासाठी शेंगभाज्या, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुटस्, करकरीत फळे (उदा. सफरचंद) आहारात असावीत. उष्ट्रासन व अनाहतासन या आसनांमुळे अनाहत चक्र संतुलित होण्यास मदत होते.