दिवाळीत लक्ष लक्ष दिव्यांनी सर्व दिशा उजळून निघतात. प्रचंड उत्साह आणि सकारात्मकता वातावरण भारून टाकते.
खरंच कुठून येतो इतका उत्साह?
तो येतो या सृष्टीतून, निसर्गातून. थंडी सुरू झालेली असते. दिवस लवकर उजाडायला सुरवात होते. वातावरण अगदी आल्हाददायक असते. निसर्गात होणाऱ्या ऋतू बदलानुसार अनेक गोष्टी उदयास येतात. जसे कि भाज्या, पालेभाज्या, फळे इ. जे आरोग्यासाठी उपयुक्त असते.
या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या पूर्वजांनी तसे सण, समारंभ, परंपरा सुरू केल्या. त्यातलाच सणांचा राजा म्हणजे दिवाळी.
या दिवाळीचे स्वागत आपण घराच्या साफसफाईने करतोच पण घराबरोबरच मनही साफ करणे तितकेच महत्त्वाचे. सर्व हेवेदावे सोडून एकमेकांना नव्याने स्वीकारणे हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि असाच विचार दिपावलीच्या प्रत्येक दिवसामागे आहे.
रमा एकादशीला आपण पहिला दिवा लावतो. म्हणजे मनातला अंधार दूर करून सकारात्मक विचार मनामध्ये आणणे.
वसुबारसेला गोधन पुजतो म्हणजे त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
धनत्रयोदशीला धन आणि धन्वंतरीचे पूजन करून निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो.
नरकचतुर्दशीला सुर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतो. म्हणजे तेलाने मालिश करून मग उटणे लावून स्नान करतो. परंतू हे फक्त त्या दिवसापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण हिवाळा ऋतूत करणे गरजेचे आहे.
लक्ष्मीपूजनाला आपण धन, जुने पूर्वापार चालत आलेले दागिने, रत्ने यांची पूजा करतो. यामागे आपल्या परंपरा जपणे, नाती व भावना जपणे हे अभिप्रेत आहे.
पाडव्याला बायको नवऱ्याचे औक्षण करते, आणि नवरा ओवाळणी घालतो. यामागे एकमेकांमधील प्रेमभावना जपणे, एकमेकांचा आदर करणे असे अभिप्रेत आहे.
दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. बहिण भावाला ओवाळते, भाऊ ओवाळणी देतो.
ओवाळण्यामागे खूप मोठा अर्थ आहे. आपण त्यांनाच ओवाळतो जे काहीतरी चांगले काम करतात. नवऱ्याने आणि भावाने केलेल्या सत् कर्मांसाठी त्यांना ओवाळले जाते. आणि या कौतुकाची पोच म्हणजे घातलेला ओवाळणी असते.
दिवाळीला सर्व कुटुंब एकत्र येते, सुखदुःखांची देवाण घेवाण होते. एकमेकांच्या सहवासात फराळ केला जातो, जेवताना ४ घास जास्त जातात. मन प्रसन्न रहातं आणि मन प्रसन्न असलं की पचनही चांगलं होतं. प्रकृती सुधारते.
इतके सुंदर विचार आपल्या प्रत्येक सणांमागे, परंपरांमागे आपल्या पूर्वजांनी केलेले आहेत. त्याचे पालन करताना त्यामागचा अर्थ समजवून घेतला तर ते सण साजरे झाल्याचं सार्थक होईल.
सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
डाॅ. अमृता चांदोरकर
निरामय वेलनेस सेंटर